परमपूज्य बापुंनी गुरुवार दि. ३१-मार्च-२०१६ रोजी हॅम रेडिओ किंवा ऍमेच्युअर रेडिओ बद्दल आपल्या सर्वांना माहिती सांगितली, व हे देखील सांगितले कि हॅम हाच येणाऱ्या काळामध्ये सर्वात महत्वाचे संपर्काचे साधन ठरणार आहे. जेव्हा मोबाइल फ़ोन्स, लॅंड्लाइन फ़ोन्स बंद पडतात, इंटरनेट बंद पडते, तेव्हादेखील फ़क्त हा हॅम रेडिओच सुरु रहातो, व हे रेडिओ वापरणारे लोक (हॅम्स) आपापसात नीट संपर्क ठेवु शकतात. तर आता आपण बघुया कि "हॅम रेडिओ" म्हणजे नक्की काय व हा कसा वापरला जातो.
"हॅम रेडिओ" म्हणजे एकमेकांशी संपर्क ठेवु शकणारी बिनतारी (वायरलेस) संपर्क यंत्रणा (कम्युनिकेशन सिस्टीम). वरकरणी हॅम रेडिओ हा एखाद्या जुन्या टेलिफ़ोन किंवा वॉकी टॉकी सारखा वाटतो. शक्यतो सर्व लॅंडलाईन टेलिफोन हे एकमेकांना तारांच्या (वायर्स) द्वारे जोडलेले असतात, पण हॅम यंत्रणा मात्र पुर्णपणे रेडियो लहरींवर (इलेक्ट्रोमॅग्नेटीक वेव्हज) चालते. ह्या हॅम रेडिओजना एक ऍन्टेना जोडलेली असते, व ह्या ऍन्टेना द्वारे हे हॅम रेडिओ हे वायरलेस रेडिओ सिग्नल पाठवु किंवा स्विकारु शकतात. म्हणुनच हॅम यंत्रणा हि इतर कुठ्ल्याही मोबाइल टॉवर किंवा टेलिफ़ोन वायर्स वर अवलंबुन नसते, व म्हणुनच ह्या दोन्ही गोष्टी बंद पडल्यावर सुद्धा विनासायास चालु राहाते. व ह्या हॅम रेडिओ चा वापर करुन आपण जगभर पसरलेल्या हॅम युजर्स शी संपर्क साधु शकतो.
साधारण १९०१ साली पहिला बिनतारी संदेश इंग्लंडहून अमेरिका खंडात पाठवण्यात मार्कोनी ह्या शास्त्रज्ञाला यश आले व नंतर मार्कोनीपासून स्फूर्ती घेऊन अनेक रेडिओ प्रक्षेपण केंद्रे उभी राहिली. व लवकरच त्यावर सरकारी नियंत्रण आले. मात्र काही ठराविक फ़्रिक्वेन्सीज चा वापर करून काही हौशी रेडिओ ऑपरेटर व केंद्रे एकमेकांशी संपर्क साधु लागली, ज्यांना केवळ एक छंद म्हणुन (हॉबी) हा रेडिओ वापरायचा होता, व ज्यांना ह्याचा वापर व्यावसायीक किंवा पैसे कमवण्यासाठी करायचा नव्ह्ता. ह्या छंदातुनच ह्या हौशी रेडिओ ऑपरेटर ग्रुप ची निर्मिती झाली व ह्याला जगभरात मान्यता देखील मिळाली. हा हौशी रेडिओ म्हणजेच 'हॅम रेडिओ' आणि त्याचा वापर करणारे हौशी कलाकार म्हणजेच 'हॅम्स'.
हॅम रेडिओ हा जरी हौशी छंद असला तरी, त्याच्याद्वारे इतर देशात संपर्क साधता येत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये, म्हणून सरकारने यावर काही निर्बंध घातले आहेत. सर्वप्रथम म्हणजे, हया छंदांचा उपयोग पैसा कमावण्यासाठी करता येत नाही. तसेच कुठल्याही प्रकारचा राजकीय संपर्क यावरून साधता येत नाही. जाहिरात किंवा व्यापारासाठी हया रेडिओचा वापर करता येत नाही. ह्या नियमांमुळेच हॅम रेडिओ चे महत्व अबाधीत राहाते, व एक छंद म्हणुन किंवा आपत्ती काळात ह्याचा उचीत वापर हॅम्स ना करता येतो.
कोणीही भारतीय नागरीक हा हॅम बनु शकतो, ह्याला शिक्षणाची कुठलीही अट सरकारने ठेवलेली नाही. ज्याप्रमाणे गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हींगचा परवाना लागतो, त्याप्रमाणे हया हौशी रेडिओचा वापर करण्यासाठी देखील एक परवाना काढावा लागतो. मात्र यासाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान आणि थोडं इलेक्ट्रॉनिक्सचं जुजबी ज्ञान आवश्यक असतं. काही ठिकाणी हॅम रेडिओ चे कोर्सस देखील घेतले जातात. ज्यामधे हे सगळे विषय शिकवले जातात. ह्या कोर्स मध्ये मोर्स कोड तसेच इलेक्ट्रॉनिक्सचं चे ज्ञान अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवले जाते, त्यामुळे प्रत्येकजण - ज्याला टेक्निकल नॉलेज नाही, अशी व्यक्ती सुद्धा हि परीक्षा देण्यासाठी पात्र होउ शकते, तसेच हि परिक्षा उत्तीर्ण देखील होउ शकते.
हॅम रेडिओ चा वापर करुन एखादा संदेश रेडिओ लहरींद्वारा एकाच वेळी खुप मोठ्या एरिया (क्षेत्र) मधे पसरू शकतो मात्र जिथे संपर्क साधायचा तेथे हॅम रेडिओ केंद्र असायला हवे. त्यामुळे जेवढे जास्त हॅम रेडिओ ऑपरेटर एखाद्या शहरात किंवा राज्यात असतील, तेवढीच मजबूत संपर्क यंत्रणा तिथे तयार होते, व त्यामुळे आपत्तीकालात, बचावकार्यात त्याची मदत होउ शकते. व आपण आपल्या निकटवर्तीयांशी संपर्क साधु शकतो, तसेच इतरांना मदत देखील करु शकतो.
चला तर मग, येणाऱ्या काळात "आधार" बनु शकणाऱ्या ह्या अनोख्या हॉबी मध्ये आपणही पण सहभागी होउया व लवकरच आपण पण हॅम्स बनुया....
----------------------------------------- -----------------------------------------
हॅम रेडिओ बद्दलच्या काही बातम्या -